विज्ञान म्हणजे काय?
विज्ञान म्हणजे काय? निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली, पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती (Knowledge ascertained by observations, critically tested, systematized & brought under general principles). वेगळया शब्दात सांगायचं म्हणजे, तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं. आपल्याला ज्याचं कारण चटकन सांगता येत नाही, ती गोष्ट दैवी किंवा अतिमानवी मानणं चुकीचं आहे. निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्कानं त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं, ते योग्य आहे की नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत, आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. 'पुरावा तेवढा विश्वास' या पद्धतीनं विचार केला, तर जगात चमत्कार शिल्लकच उरत नाहीत. उरतात ती, कदाचित सोडवायला कठीण, अशी कोडी! एखादी घटना त्याच पद्धतीनं का घडते हे शोधून काढण्याची, सत्यशोधनाची वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत! विज्ञानाची सुरवात झाली आग पेटवून ती टिकवण्याच्या शोधातून. कोरडी पडलेली दोन झाडाची खोडं प...