बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती
राजूर येथे ५५ अल्पवयीन मुली गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. मात्र, माध्यमांमध्ये झळकलेल्या घटनाच आपल्याला दिसतात; ज्या घटना समोर येत नाहीत, ज्या बालिका भीतीपोटी किंवा सामाजिक दबावामुळे बोलू शकत नाहीत, त्यांचे काय? हा प्रश्न अधिक अस्वस्थ करणारा आहे. बाल लैंगिक अत्याचार, बालविवाह, अल्पवयीन गर्भधारणा आणि बालकांवरील हिंसा या घटना केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, त्या समाज, प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सामूहिक अपयशाचे प्रतीक आहेत. जोपर्यंत प्रतिबंधात्मक (Prevention-Based) पातळीवर सातत्यपूर्ण आणि संस्थात्मक काम होत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. केवळ एखादी घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करणे किंवा आरोपींना अटक करणे पुरेसे नाही. बाल संरक्षण ही केवळ पोलीस यंत्रणेची जबाबदारी नसून, ती संपूर्ण सामाजिक आणि प्रशासकीय यंत्रणेची संयुक्त जबाबदारी आहे. बालकांसोबत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची पालक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन समिती, गाव बाल संरक्षण समिती, पंचायत समिती, पोलीस प्रशासन आणि बाल संरक्षण यंत्रण...