संघटनांचे आजारपण आणि त्यावरील उपाय

             गेल्या अनेक वर्षांपासून संघटनांमध्ये वावरतो आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे त्यामुळे तो एकटा राहूच शकत नाही. त्यात जर एखाद्याला सामाजिक कार्याची आवड असेल तर तो शांत नसतोच सतत काहीना काही उपक्रम त्याच्या डोक्यात सुरू असतात, मग तो आपल्या विचारांशी सुसंगत असणाऱ्या माणसांसोबत त्याच्या मनातील उपक्रम वास्तवात उतरवण्यासाठी प्रयत्न करत असतो. हळूहळू अशा समान विचारांची प्रेरित होऊन एक संघटन उभे राहते व मग तो एका संघटनेच्या स्वरूपात काम करायला सुरुवात करतो व त्याला एक मूर्त स्वरूप प्राप्त होते. काही नितीमुल्ये तयार होतात, एक विचारधारा मिळते याच आधारावर संघटनेचे कार्य सुरू होते. मग हळूहळू हेच संघटन समाजात एक वेगळी ओळख निर्माण करते.

               संघटनेची बांधणी किंवा संघटनेतील सारख्या विचारांच्या माणसांची संख्या वाढण्यासाठी किंवा संघटन सुरळीत चालण्यासाठी म्हणा एक व्यस्थापन बनते. व या व्यवस्थापनाद्वारे संघटनेचे सर्व कामकाज सुरू होते. व्यवसायात जसे व्यस्थापनाचे स्तर असतात अगदी त्याच प्रमाणे सामाजिक संघटनेत देखील व्यवस्थापनाचे वेगवेगळे स्थर असतात. ज्या व्यवसायाचे किंवा संघटन चांगले, पारदर्शक कारभार, सर्वांचा क्षमतेनुसार सहभाग इ.. असते तो व्यवसाय किंवा संघटना नावलौकिक मिळते व प्रचार आणि प्रसार आपोआप जनमानसात पोहचतो.

               व्यवस्थापनाच्या स्तरांमध्ये उच्च स्तरीय व्यवस्थापन, मध्यम स्तरीय व्यवस्थापन व निम्न स्तरीय व्यस्थापन असे तीन प्रकार पडतात. आता सामाजिक संघटनेत ही हे तीन स्तर असतात फरक इतकाच की उच्च स्तरीय व्यवस्थापनाला राष्ट्रीय कार्यकारिणी, मध्यम स्तरीय व्यवस्थापनाला राज्य कार्यकारिणी व निम्न स्तरीय व्यवस्थापनाला उर्वरित सदस्य किंवा जिल्हा स्तरीय व त्याखालील सर्व कार्यकारिणीची व सदस्यांचा सहभाग होतो. मी वाणिज्य शाखेचा अभ्यास करताना या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केला आहे. मला सामाजिक कार्य करताना संघटनात्मक वर्तन, ज्ञान व्यस्थापन, व्यवसायिक संवाद या विषयाची नेहमी आठवण येते. कोणतीही संघटना असो वा व्यवसाय तो सुरळीतपणे चालण्यासाठी व पारदर्शकपणे कार्य होण्यासाठी किंवा त्याचा प्रसार जनमानसात रुजण्यासाठी हे विषय फार उपयुक्त आहेत.

               गेल्या काही दिवसांपासून संघटनांचे चित्र फारच विचित्र होताना दिसत आहे. संघटनेमध्ये अनेक स्वभावाचे, अनेक प्रवाहाचे, अनेक वेगवेगळ्या परिस्थितीतील लोक येत असतात. प्रत्येकाचा एखाद्या घटनेकडे किंवा कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा ज्याच्या त्याच्या स्वभाव, परिस्थतीती व आकलणानुसार वेगवेगळा असतो. एखादा उपक्रम घेण्याचा, एखादा प्रश्न सोडविण्याची पद्धती वेगळी असते. प्रत्येकात काहीतरी वेगळे कौशल्ये असतात. आणि हेच कौशल्य संघटना वाढीसाठी पूरक / उपयुक्त असतात. परंतु जेव्हा जेव्हा संघटनेतील व्यवस्थापनातील विविध स्तरांमध्ये समन्वयाचा अभाव किंवा एकमेकांबद्दल पूर्वग्रह करून घेतल्यामुळे, संवादाच्या अभावामुळे किंवा एखाद्या सदस्यातील उपयुक्त क्षमता ओळखु न आल्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय न घेता आल्याने संघटन वाढीला मोठा अडथळा बसतो किंवा तिथे ती वाढ घटीकडे जाते. ज्या संघटना व्यवस्थापनातील हे सर्व बारकावे लक्षत घेऊन काही नवनिर्मिती करण्यासाठी या त्रुटी दूर करून नवीन उपक्रम देतात त्या निश्चितपणे  या बदलत्या व आराजकतेच्या युगात संघटना मजबूत करण्यात यशस्वी होतील. वैयक्तिक व सामूहिक पातळीवर सातत्याने क्षमता व कौशल्ये संघटनेसाठी वापरण्याची संधी प्रत्येकाला भेटल्यास संघटना नक्कीच मजबूत होऊ शकते.

               संघटनेमध्ये उच्च स्तर हा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. याच स्तरावरून संघटनेची दशा आणि दिशा ठरत असते. संघटनेत आपल्या साथीदारांना शिकण्याची किंवा कौशल्ये वापरण्याची संधी निर्माण करून देण्याचे वातावरण याच पदाधिकाऱ्यांकडून होणे गरजेचे असते. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची प्रत्येक सदस्यांची ओळख असायला हवी त्याच्या कार्यक्षमतांची ओळख असायला हवी. सहकाऱ्यांकडील गुण, अवगुण, क्षमता ओळखून त्या क्षमतांचा वापर संघटना वाढीसाठी करता यायला हवा. मला "गार्विन" यांनी केलेली व्याख्या आठवते आहे- "जे संघटन ज्ञानाची निर्मिती, प्राप्ती आणि प्रसार करण्यावर भर देऊन  सहकाऱ्यांच्या मनात नवीन कल्पना अंत:प्रेरणा निर्माण करू शकते त्यास शिकाऊ संघटन असे म्हणतात" ज्या ठिकाणी सर्व स्तरावरील सहकारी वैयक्तिक व सामूहिक पातळीवर त्यांच्या कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतात त्या संघटनांना विस्तारासाठी विशेष मेहनतीची गरज नसते. त्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे मात्र गरजेचे आहे त्या गोष्टी पुढीलप्रमाणे सांगता येतील.-

१.प्रभावी सुसंवाद:-
                संघटनेतील संवाद हा संघटना वाढीसाठी खूप महत्त्वाचा असतो.  पदाधिकारी व सहकारी यांच्यातील संवाद हा सहऱ्यांना काम करण्यास प्रोत्साहन देणारा व आवडीने काम करण्यास प्रवृत्त करणारा असायला हवा. मग त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या विषयांवर मुक्त चर्चा सत्र आयोजित करावी. व सहकाऱ्यांना त्यांच्या सर्व संकल्पना मांडण्याची संधी दयावी. जे सहकारी त्याच्या पातळीवर काहीतरी काम करत असतो ते संघटनेसाठी खूप महत्वाचे असते. हे लक्षत घेऊन पदाधिकाऱ्यांचा संवाद त्या दृष्टीने व्हायला हवा. यासाठी वेळोवेळी चर्चा सत्र, परिसंवाद यांसारखे उपक्रम सर्व स्तरांमध्ये आयोजन करायला हवे. प्रत्येक सहकारी हा वेगवेगळ्या व्यवस्थेतून आलेला असतो त्याला संघटनेत काम करायला आवडते त्यामुळे संघटनेत त्याला एक चांगली व्यवस्था अनुभवण्यास यायला हवी. थोडक्यात सहकार्याचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी पदाधिकाऱ्याने घेणे गरजेचे असते. समतेचा विचार आचरनातून दिसायला हवा जेणेकरून विसंवाद घडत नाही. किंवा नवीन प्रश्न निर्माण होत नाहीत.

२.सहभाग:-
               संघटनेत सर्व ठिकाणी काम करत असताना सर्वांचा क्षमेतनुसार सहभाग कसा घेता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे. एखाद्या उपक्रमाचे नियोजन करताना निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग घेतला गेला पाहिजे. व्यस्थापन स्तरात समन्वय साधून सर्वांचा सहभाग कसा घेता येईल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे यामुळे पारदर्शकता राखली जाईल व सहकाऱ्यांना आवडीने व उत्साहाने काम करण्यास प्रेरणा मिळेल.

३.समन्वयाची भूमिका:-
               अधिकार गाजवण्याची, सत्ता गाजवण्याची किंवा केवळ आज्ञा देण्याची भूमिका न ठेवता मार्गदर्शनाची, मित्रत्वाची, सहकार्याची भूमिका ठेवल्यास संघटनेत मानवी सबंध चांगले राहण्यास मदत होते. सहकारी उत्साहाने काम करतात. अशी वृत्ती ठेवल्यास सहकारी प्राधान्य क्रमाने संघटनेची कामे करतात. व त्यामुळे सहकाऱ्यांस आपल्या नवनवीन संकल्पना व कल्पकतेला वाव मिळतो व त्याचा उपयोग करून संघटना वाढीसाठी मदत होईल.

४.अधिकार व जबाबदारी:-
               संघटनेत जेव्हा एखाद्या सहकाऱ्यावर जबाबदारी सोपविली जाते, तेव्हा त्यास त्या जबदरीसाठीचे अधिकार ही देने गरजेचे असते. अधिकाराशिवाय कोणतीही जबादारी प्रभावीपणे पार पाडणे शक्य नाही. अधिकार व जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांच्यात संतुलन टिकून ठेवणे हे जबाबदारी देणाऱ्याचे आणि घेणाऱ्याचे काम असते.

(क्रमशः-....)

-©स्वप्निल मानव

Comments

  1. चांगला प्रयत्न आहे ,अजुन विचार व्हावा.. मार्गदर्शक ठरेल

    ReplyDelete
    Replies
    1. हो नक्कीच अजून विचारपूर्वक लिहिण्याचा प्रयत्न करतो

      Delete

Post a Comment