निःस्वार्थ मदतीची भावना

       प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही चढउतार सुरूच असतात. या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करत असतो. 
मदत बऱ्यादा आपल्याला जाणवते की, समोरच्याला मदतीची गरज आहे किंवा समोरच्या स्वतःहा आपल्याकडे मदत मागतो आशा वेळी केली जाते. कोणत्याही परिस्थितीत ही मदत करत असताना समोरच्याला ओझे वाटेल किंवा उपकाराची भावना येईल अशी मदत कधीच करू नये. मदत का करतो? तर कुणाला तरी कठीण काळात गरज असते म्हणून आपण मदत करतो आणि आपल्याला ती मदत करणे शक्य असते म्हणून ती मदत करू शकतो. आपण ती मदत केली नाही तर दुसरं कुणीतरी त्या व्यक्तीला ती मदत करणारच असतं किंवा समोरचा व्यक्ती त्यातून काहीतरी मार्ग काढणारच असतो. त्यामुळे आपल्याच मदतीमुळे समोरचा व्यक्ती आता सुखावला आहे असा भाव मनात येऊ नये, आणि जर तो येत असेल तर आपण समोरच्याला मदत नाही तर व्यवहार केला आहे असा अर्थ होतो. मग हा व्यवहार असेल तर त्याची कल्पना दोन्ही व्यक्तींना सारखीच असायला हवी. 
             आपण मदत करतो म्हणजे काही ना काही अपेक्षा असतातच असं म्हटलं जातं, हो त्यातूनचं एकमेकांना आधार मिळतो हे ही तितकंच खरं आहे, पण जेव्हा मी मदत केली मग समोरच्याने ही प्रत्येक वेळी मदत करायलाच पाहिजे हा अट्टाहास जेव्हा करतो तेव्हा अशी मदत करूच नये. हो जर मदत करताना काही हेतू असेल तर तो स्पष्ट सांगावा. एखाद्याला जर आपण मदत करत असू, तर मदत करत असताना आपण समोरच्याला ती मदत का करत आहोत हे आपल्याला आणि समोरच्याला ही नक्की माहीत असायला हवं. मग समोरच्या व्यक्तीला ही ठरवता येत की, तुमची मदत घ्यायची की नाही. मदत करून झाल्यावर अपेक्षा करणे चुकीच आहे. मदत ही मदतच असावी, त्यामुळे कुणाला तरी अपराधीपणा किंवा उपकाराची भावना येत असेल तर मी मदत असूच शकत नाही. (जर त्यात स्पष्ट बोललेलं नसेल तर) मग नंतर मनात अशी ही भावना यायला लागते अरे मी समोरच्या व्यक्तीला इतकी मदत केली तर त्याने पण मला प्रत्येक वेळी मदत केलीच पाहिजे हा अट्टहास धरला जातो. 
         आपण एखाद्याला मदत केली तर समोरचाही त्याची जाणीव ठेवतच असतो त्याला शक्य असेल तर तो ही मदत करतोच, त्याच्याही मनात मदत करण्याची भावना नक्की येतेच आणि हे नैसर्गिक आहे. पण एखाद्या वेळी त्याला शक्य नसेल तर त्याच्याबद्दल आपण पूर्वी केलेल्या मदतीचा संदर्भ घेऊन चर्चा करणारे किंवा तो व्यक्ती किती स्वार्थी आहे याबद्दल बोलणं म्हणजे जर कठीणच न... मग अगदी यापूर्वी त्या व्यक्तीसोबतचे आयुष्यातले कितीही चांगले प्रसंग असले तरी समोरच्याला त्या एका प्रसंगावरून वाईट ठरवायला लागलो तर आपण आपल्यालाही तपासायला हवं. आणि मदत ही मदतच असावी.
              आयुष्यात आपण मदत अनेक व्यक्तींना करत असतो. ओळखीच्या अनोळखी कुणालाही आपल्याला जमेल तशी मदत करतो, मग ती मदत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते, जस भावनिक, आर्थिक कधी संभ्रमात असेल अश्या वेळी केलेली मदत निःस्वार्थ असावी. आपली मदत जर मनापासून माणूस म्हणून करत असेल तर जसे आपण अनोळखी व्यक्तींना मदत करून आपोआप विसरून जातो आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात पुढे जातो. अगदी तसेच ओळखीच्या व्यक्तीला मदत करताना भावना असेल तर नातेसंबंध चांगले राहण्यास मदत होते. आणि आपण नेहमीच मदत केल्याची भावना किंवा त्याची जाणीव करून देत असू तर त्या मदतीची किंमत राहत नाही. अशी मदत न केलेली कधीही चांगलं. 
           आपण आपल्याबद्दल आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल पण समाजात एक दृष्टीकोन तयार व्हायला लागतो. त्यामुळे मदतीचं स्वरूप कोणतंही असो, ती मदत केल्यानंतर मदत करणाऱ्याला आणि मदत घेणाऱ्याला कधीच चुकीची भावना मनात यायला नकोयाची माणूस म्हणून पुरेपुर काळजी घ्यायला हवी.

© स्वप्निल मानव

Comments

Post a Comment