ऑनलाईन दुनियेतील लैंगिक अत्याचार
पुरुष म्हणून जन्माला आल्याचे अनेक फायदे आहेत. समाजात बिंधास्तपणे वावरता येते. कोणीही आपला नजरेने बलात्कार करत नाही. बिंधास्त बोलता येते, व्यक्त होता येतं. स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेता येतो. पण स्त्री म्हणून जन्माला आल्याचे खूप सारे तोटे आहेत. समाजानी लादलेल्या अनेक बंधनांचा सामना करत जगावं लागतं. मुलींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खूप साऱ्या मर्यादा येतात. फेसबुक, व्हॉट्सअप या समाजमाध्यमांवर मला हवे ते विचार मांडू शकतो. पण एखादी मुलगी बिंधास्त व्यक्त व्हायला लागली की तिला पुरुषीवृत्तीचा सामना येथेही करावा लागतोच. मुळात एखाद्या मुलीने बिंधास्त व्यक्त होणं,वागणं हेच या पुरुषप्रधान व्यवस्थेत अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. मुलीने मुलाकडे पाहून नुसतं हसलं तरी त्या हसण्याचे वेगवेगळे अर्थ काढणारी पुरुषी जमात आहे. फेसबुकवर मी माझे विचार व्यक्त करतो. अनेकजण ते वाचतात पण माझा inbox मेसेजनी लगेच फुल वगैरे होत नाही. परंतु एखाद्या मुलीने तिचे विचार बिंधास्त व्यक्त केले तर मात्र तिला अनेक मेसेजचा, comments चा सामना करावा लागतो. Hi पासून सुरू झालेला प्रवास थेट whats app नंबर पर्यंत येऊन पोहचतो. मुलींशी अशी मैत्री करण्यात काही गैर नाही पण दुर्देवाने एखाद्या मुलीकडे मैत्रीण म्हणून पाहणारा पुरुष वर्ग बोटावर मोजण्याइतपत आहे. मुलगी,स्त्री म्हणजे भोगवादी वस्तू आहे अशी चालत आलेली परंपरा आजही अबाधित आहे. समाजात वावरताना मुलींवर नजरेने बलात्कार होतोच होतो पण या नव्याने उदयास आलेल्या ऑनलाईन दुनियेत देखील लैंगिक अत्याचाराला मुलींना सामोरे जावे लागते. म्हणून मी सुरवातीलाच म्हणलं पुरुष म्हणून जन्माला आल्याचे खूप फायदे आहेत. अपवादात्मक उदाहरणं सोडली तरी मुली या लैंगिक अत्याचाराविषयी कोणाकडे बोलतही नाहीत. मुलींना अनेक लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागते पण मुली बोलत नाहीत. काही मुली screen shot टाकून अशा पुरुषीवृत्तीचे समाजाला दर्शन घडवून आणतात पण अशा कित्येक मुली आहेत ज्या मुलींना मूग गिळून हा अत्याचार सहन करावा लागतो. दोन दिवस फेसबुकवरून मैत्री झालेल्या पोराला तिसऱ्या दिवशी लगेच मुलीशी भेटायच असतं. लगेच I love you चा मेसेज पण पाठवायचा असतो. हे सगळं काही अनाकलनीय आहे. हे फक्त मी वरवरच सांगतोय. यापुढेही अनेकांची मजल जाते. फोटोची मागणी होते, बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात, chatting चे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी दिली जाते असं बरच काही घडतं. याचा प्रचंड मानसिक त्रास मुलींना होतो. पुरुष असल्यामुळे आपल्याला काय असल्या धमक्यांचा सामना करावा लागत नाही वा कोणीही सतत मेसेज करून त्रासही देत नाही. एखाद्या मुलीने खूप खराब पोस्ट लिहिली असली तरी तिथेदेखील ही पुरुषीप्रवृत्ती जाऊन comment सेक्शनमध्ये तिच कौतुक करत असतात. लैंगिक आकर्षण असतं हे मान्य आहे पण स्त्री ही माणूस आहे, तिला बिंधास्त जगण्याचा अधिकार आहे हे आपण कधी मान्य करणार ?
सगळे पुरुष एकसारखेच
स्त्रियांकडून असं विधान केलं जात हे अत्यंत बरोबर वाटायला लागतं. सामान्य पुरुष असो की सेलेब्रिटी असणारा पुरुष दोघांची स्त्रियांकडे बघण्याची वृत्तीही सारखीच असते. Me_too चळवळी अंतर्गत अनेक सेलेब्रिटी पुरुषांची नावे समोर आली. आपला ज्या अभिनेत्यावर खूप विश्वास आहे त्यावर देखील आरोप झाले. अमुक अमुक अभिनेता असं करूच शकत नाही,असं महिलांशी वागूच शकत नाही ही आपल्या मनात तयार झालेली इमेज. सत्य बाहेर आल्यावर या इमेजला देखील तडा जातो. एवढंच काय आपल्या जवळचे जिवलग मित्र, नातेवाईक असं कधी करू शकणार नाहीत असं वाटणारे देखील या पुरुषीवृत्तीत सहभागी असतात. माझ्या अवती भवती असणारा कोणताही पुरुष मग तो खूप जवळचा मित्र असो की भाऊ, तो स्त्रियांशी,मुलींशी कसं वागेल याची मी कोणतीही हमी देऊ शकत नाही. सातत्याने होणाऱ्या या लैंगिक अत्याचारामुळे प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुषांकडे संशयाने पहायला लागते. याचा फटका काही थोडेफार पुरुष जे स्त्रियांशी माणूस म्हणून वागतात त्यांनाही बसतो. या ऑनलाईन दुनियेतील प्रत्येक मुलीला/स्त्रीला लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. कित्येक जणींना लिहायचं असतं, बोलायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं पण या पुरुषी वृत्तीच्या भीतीपोटी त्या लिहीत नाही,बोलत नाहीत,व्यक्त होत नाही. अनेकजणी यामुळे नैराश्यात जातात. मला जेवढं कळतंय तेवढं मी मांडल पण माझ्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्या मुलींकडून या पेक्षा भयानक वास्तव समोर येऊ शकतं. अत्याचार सहन करणाऱ्या या मुलींचा फक्त एकदा स्फोट व्हायला पाहिजे. त्या स्फोटातूनच या पुरुषीवृत्तीच भयानक वास्तव एकेदिवशी समोर येईल. मुलीच्या नावाने फेक अकाउंट काढून देखील आपण या पुरुषीवृत्तीची चाचणी घेऊ शकतो. आपल्या जवळच्या मैत्रिणींना याविषयीचे अनुभव विचारू शकतो. पुरुषीवृत्ती नष्ट व्हायला आणि स्त्रियांकडे माणूस म्हणून बघण्याची दृष्टी पूर्णपणे विकसित व्हायला अजूनतरी बराच वेळ लागेल.
(लेखन - अज्ञात व्यक्ती)
Comments
Post a Comment