लिंगभाव: नैसर्गिक की सामाजिक?...
लिंगभाव म्हणजे काय याची स्पष्टता यायची असेल तर महत्त्वाचा प्रश्न असेल, ‘नैसर्गिक की सामाजिक?’ पुरुष सर्वाधिक हिंसा करतात, हे खरेच. पण तो निसर्गत:/जन्मत: हिंसक असतो की त्याला तसा घडवला जातो? यावर विचार केला तर लक्षात येते की, जात, धर्म, लिंग, देशप्रेम इ.च्या नावाखाली चालणारे राजकारण पुरुषाला हिंसेला प्रवृत्त करत....
‘जेंडर’ या शब्दाला मराठीत ‘लिंगभाव’ म्हटले जाते. या विषयावरच्या प्रशिक्षणात ‘जेंडर म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला की अनेकदा, ‘स्त्री’, ‘पुरुष’ अशी उत्तरे येतात. ‘लिंग’ आणि ‘लिंगभाव’ यात बऱ्याचदा गल्लत केली जाते. निसर्गाने स्त्री-पुरुषांमध्ये जे फरक केले त्याला ‘लिंग’ आणि त्याच फरकाचा आधार घेऊन समाजाने स्त्री-पुरुषांना ज्या भूमिका दिल्या आणि त्यांच्यातले सत्तासंबंध निर्धारित केले त्याला ‘लिंगभाव’ म्हणतात. मात्र, समाजात केवळ स्त्री आणि पुरुष याच दोन लिंगाची माणसे नसतात, हे ही आवर्जून नोंदवले पाहिजे. अशा व्यक्तींना ‘विभिन्नलिंगी’, ‘ट्रान्सजेंडर’, ‘इंटरसेक्स’ असे शब्द वापरले जातात. ‘स्त्री-पुरुष समानता’ हा शब्द अपुरा आहे, कारण त्यात विभिन्नलिंगी व्यक्तींची दखलच घेतलेली नाही. त्यामुळेच, आता ‘लिंगाधारित समानता’ असा सर्वसमावेशक शब्द वापरला जातो.
‘स्वयंपाक करणे’, ‘जेवण वाढणे’ या भूमिका स्त्रियांच्या तर ‘कमावून आणणे’, ‘संरक्षक असणे’ या पुरुषांच्या भूमिका मानल्या जातात. घरात स्वयंपाक करण्याला आणि जेवण वाढण्याला कोणताही आर्थिक मोबदला नसतो. मात्र, हॉटेलमध्ये स्वयंपाक केल्यास, जेवण वाढल्यास पैसे मिळतात! मग ही कामे करायला पुरुष तयार होतो! त्यामुळेच घरात स्वयंपाकाची जबाबदारी स्त्रियांवर असते तर हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये पुरुष अधिक प्रमाणात दिसतात. ‘पुरुषांना स्वयंपाक करणे जमत नाही’ असे मानले जात असल्याने स्त्रियांना घरच्या जबाबदाऱ्या सोडून सहसा कुठे जाता येत नाही. कुठेही जायचे झाले तर त्याचा त्यांच्यावर ताण येऊ शकतो. ‘लिंगभाव’ राजकारण काय असते याची कल्पना असलेली व्यक्ती विचारेल, ‘पुरुषांना स्वयंपाक येत नाही, हे नैसर्गिक आहे की सामाजिक?’ उत्तर अर्थातच ‘सामाजिक’ असणार, हे उघड आहे.
घराबाहेर पुरुषाला स्वयंपाक करता येत असेल तर घरात तो सहसा का करत नाही, यामागचे अर्थकारणही लिंगभाव संकल्पनेमुळे आपल्याला समजते.
- संकलित साहित्य
Comments
Post a Comment