जरा विचार तर करू...


   आजही देशात अनेक समस्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांची मानसिकता हलकी होत चालली आहे. म्हणून समाजात मानसिकता बदलण्यासाठी काम करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणताही प्रश्न असो त्याच्या मुळाशी गेल्यावर लक्षात येईल की, वाईट मानसिकतेतूनच हे सर्व प्रकार घडत आहे आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणावर हिंसेचे प्रमाण वाढत चालले आहे. ही हिंसा थांबविण्यासाठी अनेक अंगाने मानसिकता बदलासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अनेक पैलू समजून घेऊन समाजात चर्चा आणि संवाद व्हायला हवा.
      गेल्या अनेक वर्षांपासून बलात्कार, छेडछाड हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे इतक्यावरच थांबत नाही तर बलात्कारानंतर अगदी क्रूर पध्दतीने खून देखील होत आहेत. हे चित्र फार त्रासदायक आहे. असे अमानुष प्रकार कोणताही हंगाम पाहून होत नाही तर कोणत्याही काळात हे प्रकार घडू शकतात. लॉकडाऊनच्या काळात देखील असे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी आजपर्यंत काय झाले? 
कँडल मार्च, आंदोलन, मोर्चे, निवेदन... पण पुढे काय? 
या सगळ्यात पिडीत व्यक्तीला खरंच न्याय भेटला का? 
हे प्रश्न अनुत्तरित राहिले. 
        कँडल मार्च, आंदोलन, मोर्चे, निवेदन हे गरजेचे नाही असं नाही ते पण गरजेनुसार होणे अपेक्षित आहेच. पण त्यासोबत निरंतर प्रक्रिया होत राहणं आवश्यक आहे.
बलात्कार, छेडछाड हे अगदी असिफा केस पासून तर आताच्या परिस्थिती पर्यंत जरी विचार केला तरी परिस्थिती फारशी बदललेली दिसत नाही. कँडल मार्च, आंदोलन, मोर्चे, निवेदन हे सगळं किती दिवस चालते हेही आपल्याला माहीत आहे. जास्तीत जास्त एक-दोन महिने त्यानंतर दुसरा विषय यासाठी तयार असतो. हा विषय कधी मागे पडतो हे लक्षातही येत नाही. म्हणून कोणतीही हिंसा रोखण्यासाठी किंवा किमान कमी करण्यासाठी निरंतर यावर काम करणे, चर्चा होणे, संवाद होणे खूप गरजेचे आहे.तर आणि तरचं थोडाफार तरी प्रमाण कमी होतं आहे अस आपण म्हणू शकू. समाजात अनेक प्रश्न आहे, प्रश्न कोणताही असो त्यावर निरंतर संवाद आणि काम झालं तरच त्या प्रश्नाच्या मुळाशी पोहचू शकू आणि आपल्याला समाजात पोषक वातावरण तयार करू शकू. 
मग ही जबाबदारी कुणाची?
 तर नागरिक म्हणून सर्वांची आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या कौशल्ये, ज्ञानानुसार आणि माहितीनुसार जमेल तितकं जबाबदारी घेऊन ही मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वच विषयावर सर्वांना जमेलच असही नाही, पण किमान आपल्या आजूबाजूला असे परिवर्तन करू पाहणाऱ्या नागरिकांना जमेल तशी मदत करणे गरजेचे आहे. आपल्या बाजूला अनेक विषय घेऊन काम करणाऱ्या संस्था आहेत, चळवळी आहेत.काही ग्रुप आहेत यांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून पण या कामात आपला सहभाग देऊ शकतो. कारण परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक विषय तितकेच महत्त्वाचे आहे. एकमेकांना साथ देऊन समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे खूप गरजेचे आहे. 
यासाठी पुरुषभान संवादमंच गेल्या दोन वर्षांपासून या सर्व गोष्टींचा विचार करून समाजात मानसिकता बदलासाठी छोटासा प्रयत्न करत आहे. हा मंच लिंग, लैंगिकता, लिंगभाव व संवेदनशीलता यावर काम करत आहे. यातून निर्माण होणारी विषमता, पुरुषप्रधानता, मर्दानगी, सेक्स, रिलेशनशिप, प्रेम, जोडीदाराची निवड अश्या अनेक मुद्द्यांवर काम करत आहे. या सारख्या उपक्रमांची आज खूप गरज आहे. 
   असे प्रश्न पडणं आणि यावर काम करणं खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.कारण फक्त प्रश्न मांडून चालणार नाही तर त्यावर उपाय देखील शोधणे, समतेच्या वाटेने काम करणं गरजेचे आहे.
    कोणतीही हिंसा ही एखाद्यावर सत्ता गाजवण्यासाठी, स्वतःच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, एखाद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आपल्या म्हणण्यानुसार वागावण्यासाठी केली जाते. त्यामुळे या हिंसेचे मूळ ही मानसिकताचं आहे.  ही हिंसेची वृत्ती किंवा नियंत्रण लादण्याची वृत्ती आपल्या संस्कृतीत असलेल्या परंपरा, चालीरीती, रूढी आणि सण समारंभ यातून अधिक घट्ट होताना दिसत आहे. म्हणून या सर्व घटकांवर चिकित्सक चर्चा, संवाद होणे खूप गरजेचं आहे अस मला वाटतं. मानसिकता बदलाच अनेक पैलू आहेत ते सर्व समजून घेऊन त्यावर समर्पक चर्चा होत नाही तोपर्यंत चित्र बदलणार नाही. 

एक जबाबदार नागरिक बनवूया... स्वतःवर या सगळ्या अंगाने अपडेट राहून काम करता करता आपल्या आजूबाजूला सुरक्षित व पोषक वातावरण त्यावर करण्यासाठी योगदान देऊया. 

©स्वप्निल मानव, (सदस्य, पुरुषभान संवादमंच)

Comments

Popular posts from this blog

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...