Mentalhealth and relationship
#mentalhealth #relationship #friendship #love
ब्रेकप आणि त्यातून येणारे नैराश्य याबाबतच्या घटना आपण आजकाल सर्रास टीव्हीवरील बातम्यांमध्ये पाहतो, ऐकतो. अनेक जणांच्या बाबतीत ही एक सामान्य घटना असू शकते, काहींना दरवेळी ठराविक काळानंतर नवीन नात्यात गुंतण्याची सवय असू शकते. तर काहींच्या बाबतीत आयुष्य बदलून टाकणारा हा प्रसंग असतो. बऱ्याच जणांना प्रेम, मैत्री, रिलेशनशिप यातले नेमके काय हवे आहे हे माहीत नसते. काहीजणांना माहीत असते तर काहींना माहित असून देखील ते लोक त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे या भावनांचा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात, किंवा कुणी नवीन व्यक्ती आवडू लागते पण स्पष्ट बोलता येत नाही, किंवा तात्पुरते रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला भ्रमात ठेवले जाऊ शकते, पण जबाबदारी घेण्याची तयारी नसल्यामुळे गोष्टी अंगावर आल्या की झटकल्या जाऊ शकतात. काही वेळा एकापेक्षा अधिक व्यक्ती आवडू लागतात. रिलेशनशिपमध्ये ओपन रिलेशनशिप सारखे देखील प्रकार असतात. अशा अनेक गोष्टींची अस्पष्टता तयार झाल्यामुळे कधीतरी आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी व्यक्ती, आपले चांगले मित्र-मैत्रिणी दुखावले जाऊ शकतात. कोणत्याही नात्यात समजूतदारपणा हा दोन्ही बाजूने असणे खूप गरजेचे आहे नाहीतर कुणी एक व्यक्ती दरवेळी समजून घेत राहते आणि दुखावली ही जाते.तुटणं जोडलं जाणं अशा गोष्टी घडतच असतात, पण प्रत्येक नात्यातली आपली संकल्पना स्पष्ट असली आणि त्याची स्पष्ट जाणीव आपण समोरच्याला दिली तर या नैराश्याच्या घटना टाळता येतात. चांगले मानसिक स्वास्थ्य ही प्रत्येकाची गरज आहे आणि ते जोपासणे ही प्रत्येकाची जबाबदारी. अशा प्रसंगी समोरच्या व्यक्तीशी अबोला, भांडणे, टाळाटाळ करणे याने एखाद्याची मानसिक अवस्था अजून बिकट होऊ शकते. पण ज्या व्यक्तींच्या, मित्रांच्या आपण जवळ होतो किंवा आहोत त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी संवादातून मार्ग काढून ही परिस्थिती सुधारली जाऊ शकते आणि त्यांना नैराश्यात जाण्यापासून तसेच कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्यापासून आपण वाचवू शकतो.
©नंदिनी
Comments
Post a Comment