कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव
नवीन ट्रेक, नवीन मित्र... आणि निसर्गाच्या कुशीत हरवलेली एक अविस्मरणीय भटकंती!
आजचा रविवार काहीसा वेगळा ठरला. कात्रज बोगद्यापासून सुरू झालेली ही वाट – सिंहगडपर्यंत – केवळ चाल नाही, तर एक जिवंत अनुभव होता!
अनेक डोंगर-टेकड्या, खिंडी, चढ-उतारांचा प्रवास, जवळपास १५-१६ किलोमीटरची पायपीट आणि तब्बल ५-६ तासांची भटकंतीने थकवा येईल असे वाटले तरी अनुभव मात्र थकवणारा नव्हता, तर उलट उत्साहवर्धक ठरला.
डोंगररांगेवर चढताना एका बाजूला गजबजलेले पुणे शहर आणि दुसऱ्या बाजूला शांत, निळसर-हिरवट रंगांनी नटलेला निसर्ग — मनाला एक वेगळीच शांती देत होता. मध्येच कोवळं ऊन, मधूनच पावसाच्या सरी, तर काही वेळा ढगांची साऊली — निसर्गानेही जणु या भटकंतीला सोबत करत होता.
ट्रेक दरम्यान वरून बघताना सिंहगड किल्ला ढगांत लपलेला दिसत होता. त्याच्या टोकावरचा टॉवर जणू आपल्याला खुणावत होता – “चला, थोडं अजून…!” सिंहगडाचे हे खुनावणे आम्हाला थांबू देत नव्हती. सिंहगडापर्यंत पोहचण्याची उर्जा त्याच्याच असण्यातून मिळत होती.
राकेश पाटील मागे परदेशी सर, आणि मधून मधून एकमेकांना प्रोत्साहन देणारे सर्व सहकारी – या सगळ्यांमुळे ट्रेक अधिकच सुंदर झाला.
टेकड्यांवरून दिसणारे हिरवेगार डोंगर, तर एका बाजूला सिमेंटचं जंगल – या दोघांचं एकत्र दर्शन ही एक अनुभूती होती. मध्येच एखाद्या मोराचा आवाज कानावर पडत होता. शांततेत ऐकू येणारी वाऱ्याची सरसर – ही निसर्गाची जादू होती.
"नवरा-नवरी" खिंडीवरून सिंहगडाचे निरीक्षण करण्यात वेगळाच आनंद होता. "नवरा नवरी" खिंडीत पोहोचून पाठ टेकवत सिंहगडाकडे बघणं – ही एक वेगळीच अनुभूती होती.
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य शाबूत ठेवणारी ही वाट, एकदा तरी अनुभवायलाच हवी!
कात्रज ते सिंहगड ट्रेक म्हणजे फक्त भटकंती नाही तर त्याचबरोबर ही वाट देते- नवीन ऊर्जा, निसर्गप्रेम, नव्या ओळखी आणि कायमच्या आठवणी.
#ANAND_TREKKERS
- स्वप्निल मानव
मस्त रे 👌👌
ReplyDelete🤝😍
Deleteसुरेख
ReplyDelete