सेवा दल बढाना है, परिवर्तन लाना है!
सेवा दल ही केवळ एक संघटना नाही, तर ती एक विचारधारा आहे- समता, बंधुता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर उभी असलेली एक चळवळ. या चळवळीला पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यावर समानपणे आहे. त्यामुळे *“आपण कोणत्या गटात आहोत?” यापेक्षा “आपण सेवा दलासाठी काय करतो आहोत?” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.*
आज देशात जे सामाजिक, राजकीय आणि वैचारिक वातावरण निर्माण झाले आहे, ते पाहता सेवा दलासारख्या संघटनांची भूमिका अधिक निर्णायक ठरते. अशा वेळी आपण अंतर्गत मतभेद, वैयक्तिक अहंकार, जुने वाद किंवा व्यक्तीगत भावना यामध्ये अडकून राहिलो, तर आपण आपल्या मूलभूत ध्येयापासून दूर जाऊ. त्यामुळे ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची आणि एकत्र येण्याची.
संघटनेत मतभेद असणे हे नैसर्गिक आहे, कारण विचार करणाऱ्या लोकांमध्ये विविधता असतेच. पण हे मतभेद जर संवादाने, आदराने आणि सामोपचाराने सोडवले, तर ते संघटनेला अधिक सक्षम बनवतात. उलट, जर तेच मतभेद वादात, गटबाजीमध्ये किंवा वैयक्तिक संघर्षात रूपांतरित झाले, तर ते संघटनेला कमकुवत करतात. त्यामुळे “मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत” ही भूमिका आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे.
चुका होणे ही कोणत्याही जिवंत संघटनेची नैसर्गिक प्रक्रिया आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या चुका मान्य करून त्यात सुधारणा करण्याची तयारी असणे. आपण एकमेकांवर टीका करण्याऐवजी रचनात्मक अभिप्राय देऊ शकलो, तर त्या चुका संधीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे- “मी समस्या वाढवत आहे की उपाय शोधत आहे?”
मेळाव्याला विरोध करताना जे मुद्दे मांडले जात आहेत, ते बारकाईने पाहिले तर ते विचारांपेक्षा अधिक *व्यक्तिगत रोषातून* आलेले वाटतात. कारण कालपर्यंत जे लोक एकत्र काम करत होते, एकमेकांच्या कामाचे कौतुक करत होते, तेच अचानक काही मतभेद झाल्यानंतर एकमेकांना वेगळ्या विचारसरणीचे किंवा विरोधी ठरवू लागतात, ही बाब निश्चितच प्रश्न निर्माण करणारी आहे.
मुळात, जर एखादी व्यक्ती किंवा कार्यकर्ता खरोखरच विचाराने चुकीचा किंवा संघटनेच्या भूमिकेविरोधात होता, तर तो प्रश्न आधी का समोर आला नाही? जेव्हा एकत्र काम चालू होते, तेव्हा त्याच व्यक्तीचे काम योग्य वाटत होते, आणि आता अचानक त्याच कामाकडे संशयाने पाहिले जात आहे. हे वास्तव स्वीकारणे कठीण आहे. यामुळे असे स्पष्टपणे दिसून येते की हा वाद विचारांचा नसून *व्यक्तिगत मतभेदांचा परिणाम* आहे.
कोणावरही टीका करताना आपण त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा आणि योगदानाचा विचार केला पाहिजे. ज्यांच्यावर आज आरोप केले जात आहेत, त्यांचे आजवरचे काम नाकारता येत नाही. त्यांनी संघटनेसाठी दिलेले योगदान, केलेले परिश्रम आणि उभे केलेले कार्य, हे सगळे एका क्षणात मिटवून टाकणे हे केवळ अन्यायकारक नाही, तर संघटनेच्या संस्कृतीला घातक आहे.
“आजपर्यंत तो आपला होता, आणि आज अचानक तो परका किंवा विरोधी झाला” ही भूमिका केवळ अस्थिर नाही, तर ती संघटनेतील विश्वासाला तडा देणारी आहे. यामुळे नवीन कार्यकर्त्यांमध्येही चुकीचा संदेश जातो की येथे कामापेक्षा गट आणि संबंध अधिक महत्त्वाचे आहेत.
आपण हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की, *व्यक्तिगत वादांवर उभे राहून कोणतीही संघटना मजबूत होत नाही*. उलट, अशा वादांमुळे संघटना आतून कमजोर होते आणि तिचा मूलभूत उद्देश बाजूला पडतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोप-प्रत्यारोपांपासून दूर राहणे ही काळाची गरज आहे.
जर खरोखरच काही विचारभिन्नता असेल, तर ती खुलेपणाने, तर्काने आणि संघटनात्मक पद्धतीने मांडली पाहिजे. पण व्यक्तिगत भावनांवर आधारित आरोप करून वातावरण अधिक दूषित करणे. हे कोणाच्याही हिताचे नाही.
आज गरज आहे ती प्रामाणिक आत्मपरीक्षणाची. प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे.*“मी संघटनेला पुढे नेत आहे का, की माझ्या भावना आणि अहंकारामुळे ती मागे खेचत आहे?”*
चला, आपण सर्वांनी एक गोष्ट मान्य करूया, मतभेद असतील, चर्चा होईल, पण कोणाच्याही कामावर किंवा निष्ठेवर शंका घेण्याआधी आपण तथ्य, संदर्भ आणि संघटनेच्या हिताचा विचार केला पाहिजे. कारण शेवटी, आपले ध्येय एकच आहे- सेवा दल मजबूत करणे.
माझा स्वतःचा अनुभव सांगायचा झाला, तर २०११ पासून सेवा दल आणि छात्रभारतीमध्ये काम करताना मला अनेक चांगल्या आणि काही आव्हानात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या. ज्या वेळी चुकीच्या घटना दिसल्या, तेव्हा मी माझ्या क्षमतेनुसार भूमिका घेतली. पण मी कधीही व्यक्तीवर टीका केली नाही- नेहमी मुद्द्यावरच बोललो. कारण मला वाटते की व्यक्ती बदलू शकते, पण विचार टिकला पाहिजे.
काही वेळा या भूमिकेमुळे मला गैरसमजांना सामोरे जावे लागले. काहींना मी अडचणीचा वाटलो, काही वेळा माझ्या संघटनात्मक भूमिकेला व्यक्तिगत घेऊन माझा संघटनेशी काही संबंध नाही असेही जबाबदार लोकांनी म्हटले आहे, पण या सगळ्यांनंतरही मी सेवा दलाच्या विचारांपासून कधीच दूर गेलो नाही. आजही मी जिथे काम करतो, तिथे सेवा दलाचे मूल्य आणि तत्त्वे जपण्याचा प्रयत्न करतो.
आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे. ही केवळ संघटनेतील अंतर्गत बाब नाही, तर व्यापक सामाजिक जबाबदारीची वेळ आहे. त्यामुळे “आता नाही तर कधीच नाही” या भूमिकेतून आपण सर्वांनी पुढे यायला हवे. ही वेळ आहे स्वतःचे मुद्दे, वैयक्तिक मतभेद, आणि गटबाजी काही काळासाठी बाजूला ठेवण्याची.
मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मी कोणत्याही गटाचा भाग नाही आणि कुणालाही विरोधक मानत नाही. दोन्ही बाजूंमध्ये चांगल्या गोष्टी आहेत आणि सुधारणा करण्यासारखे मुद्देही आहेत. पण सध्या त्या चर्चेपेक्षा महत्त्वाचे आहे ते संघटनेची एकता आणि सामूहिक कृती.
आपण जर खरोखर सेवा दलाचे कार्यकर्ते आहोत, तर आपली ओळख गटांमुळे नव्हे तर आपल्या कामामुळे आणि विचारांमुळे झाली पाहिजे. त्यामुळे चला, आपण एकत्र येऊया संवाद साधूया, एकमेकांचे ऐकूया, आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेला बळ देऊया.
संघटनेला मजबूत करण्यासाठी काही ठोस पावले उचलता येतील:
१) नियमित आणि खुले संवाद मंच तयार करणे
२) मतभेद सोडवण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभी करणे
३) नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे
४) सेवा दलाच्या मूलभूत विचारांवर पुनश्च प्रशिक्षण आणि चर्चा आयोजित करणे
५) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास टिकवून ठेवणे.
६) संघटनेसाठी प्रत्येकाने दिलेले योगदान नाकारू नये. वास्तव कुणीही बदलू शकत नाही.
शेवटी, सेवा दल हे आपल्या सर्वांचे आहे. त्याचे यश किंवा अपयश हे कुण्या एका व्यक्तीचे नसून, ते आपल्यासर्वांच्या सामूहिक प्रयत्नांवर अवलंबून आहे. त्यामुळे चला, आपण सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, एकजुटीने आणि प्रामाणिकपणे सेवा दलाला पुन्हा एकदा बळकट करूया.
-स्वप्निल मानव
Comments
Post a Comment