ओळख
आज अश्या एका मुद्द्यावर बोलण्याची गरज निर्माण झाली, की जो मुद्दा नेहमी दुर्लक्षित केला जातो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातुन एकत्र / संपर्कात राहतात. उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअँप ग्रुप इ... माध्यमातून लोक संपर्कात राहतात. आज व्हाट्सअँप ग्रुपचा वापर जास्त केला जातो. मग हे ग्रुप एकत्र शिकत असतात म्हणून बनवले जातात, कामाच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचा असतो, सामाजिक क्षेत्रात काम करत असतो म्हणून त्या त्या चळवळीचा ग्रुप असतो. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांची एकमेकांशी वेगवेगळ्या माध्यमातून ओळख होते, ती कधी एकत्र काम करताना तर कधी काही कार्यक्रमात ओळख होते तर कधी कॉमन मित्राकडून ओळख होत असते. अश्याच ओळखीतून खूप वेळा वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि ओळखी वाढतात. काहींसोबत ही ओळख फक्त चेहऱ्याने होते, तर काहींसोबत नावाने होते, तर कधी ही ओळख अगदी मैत्रीच्या पातळीवर होते. ही ओळख अश्या वेगवेगळ्या प्रकारची असते. अनेक वेळा वेगवेगळ्या ग्रुप मध्ये आपले मित्र किंवा सामाजिक कार्यकर्ते एकमेकांना ऍड करतात. हे ग्रुप कामाच्या नियोजनासाठी असतात. त्यात अनेक प्रकारची चर्चा ही होते. त्यातून खुप साऱ्या गोष्टी शिकायलाही भेटतात.
या ग्रुप मधील ऍडमिन वेगवेगळ्या मित्रांना यात ऍड करतो. वेगवेगळ्या सामाजिक कामात झालेली ओळख त्यामुळे ग्रुप मध्ये ऍड केले जाते. या सर्वांची एडमीनची ओळख असते, परंतु सहभागी झालेल्या इतर सदस्यांची एकमेकांसोबत मात्र ओळख असतेच असे नाही. बऱ्याच सदस्यांची एकमेकांसोबत ओळख नसतेही. या ग्रुप मध्ये अर्थातच महिला आणि पुरुष दोन्हीही असतात. आजचा मूळ मुद्दा हा की, बऱ्याच वेळा सामाजिक कार्यकर्ता नावाच्या बुरख्याखाली बरेच लोक बऱ्याच गोष्टी खपवून नेत असतात. बऱ्याच लोकांचं समूहात असलेलं वागणं आणि वैयक्तिक असलेलं वागणं यात फरक लक्षता येतो काहींना अनुभव देखील येतो. विशेषतः मुलींना या अश्या प्रकारच्या प्रसंगांना जास्त सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा काही कामानिमित्त ग्रुप मधील इतर सदस्यांसोबत बोलण्याची गरज भासते, अश्या वेळी जर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर नसेल तेव्हा ग्रुप मधून संबंधीत व्यक्तीचा नंबर मिळतो आणि इथून संपर्क होतो. कामानिमित्त संपर्क करणे यात काही गैर नाही, पण जेव्हा या माध्यमाचा वापरत करून जर महिलांसोबत वेगवेगळ्या हेतूने बोलण्याचा प्रयत्न होत असेल तर ते मात्र गैर आहे. अर्थात ज्या व्यक्तीसोबत बोलत आहोत किमान त्या व्यक्तीसोबत आपलं बोलणं तरी झालेलं असावं. किंवा काहीतरी रेफरन्स तरी असावा बोलण्याचा, पण सामाजिक कार्यकर्ता नावाचा बुरखा घालून बरेच लोक मुलींना वैयक्तिक मेसेज करतात. बर हे समूहात एकदम वेगळं म्हणजे अस सभ्य वागतात आणि वैयक्तिक मात्र असभ्य वागतात. असे अनेक माझ्या संपर्कात असलेल्या मैत्रिणींना आलेला आहे. सगळ्यांच मुली या परिस्थितीत त्यांना हे आवडलेलं नाही हे सांगू शकत नाहीत. कारण असे बुरखाधारी कधीकधी सामाजिक क्षेत्रातील नावाजलेला किंवा त्याला मानणारा एक वर्ग असतो तो यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. अश्या परिस्थिती मुलींची खूप कुचंबणा होते. यात कधी नात्याची सत्ता असते, कधी आर्थिक सत्ता , कधी विचारांची सत्ता, कधी वयाची सत्ता असते अश्या सत्तेचा आधार घेऊन मी मंडळी असलं धाडस करत असतात.
बर हे लोक माझा उद्देश कसा तसा नव्हता हे सांगून देण्यातही खूप पटाईत असतात. हे अस सामाजिक कामाचा बुरखा घालुन सोशल मीडियावर अत्याचाराचे प्रकार घडतात.
हे झालं व्हाट्सअँप ग्रुप बद्दल, बऱ्याच वेळा कॉमन मित्र मैत्रिणींसोबत एकत्र भेटणं होत. त्यातून चेहरा आणि नाव ओळख झालेली असते. तिथे ही सोशल मीडियावर शोधून अश्या प्रकारचा अत्याचार केला जातो.मी त्याला अत्याचारच म्हणेल, कारण बाल लैगिंक अत्याचार या विषयावर काम करताना अत्याचाराचे प्रकार अश्याच प्रकारच्या गुन्ह्यांत अडकलेल्या मुलांचं समुपदेशन मी बाळ न्याय मंडळ येथे केलेलं आहे.
एक उदाहरण सांगतो, माझ्या एका मित्राने माझ्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर मागितला, पण नंबर मागणार मित्र आणि ज्या मैत्रिणीचा नंबर मागितला ती माझी मैत्रीण आणि मी, असे आम्ही तिघे एकत्रित कधी भेटलो नाही. त्यामुळे त्या नंबर मागणाऱ्या मित्राला सांगितलं की, मी विचारुन सांगतो तिला की तू नंबर मागत आहेस देऊ का? कारण मी असा नाही देऊ शकत. कारण मला नाही माहीत तुम्ही मैत्री किंवा तुमची किती ओळख आहे. त्यामुळे मी तिला विचारून देतो. मी माझ्या मैत्रिणीला विचारलं तर ती नको देऊस म्हणाली. मग मी त्या मित्राला वाईट वाटू नाही म्हणून सांगितलं की, अस कर तू फेसबुकवर तिचा मित्र आहेस तर तिच्याकडेच मग न नंबर... अस म्हणून मी थांबलो. पण मी त्याला हे क्लिअर केलं की, अस योग्य नाहीये कुणाचाही नंबर किंवा माहिती संबंधित व्यक्तीला विचारल्याशिवाय देणं चुकीचं असत. हो जर आम्ही तिघे एकत्रित आमची चांगली मैत्री असती तर मी देऊ शकलो असतो. इतकं सांगून झाल्यानंतर त्या मित्राचं तेव्हापासून माझ्याशी असलेलं वागणं बदललं. मला नंतर टाळलं त्याने नेहमी जेव्हा समोर येईल तेव्हा. सगळं समीकरणच बदलून गेले.
मी विचार केला असे का वागतात लोक. बऱ्याच वेळा सामाजिक काम करणारे लोक या कामावर बऱ्याच गोष्टी अगदी सहजपणे निभावून नेण्याचा प्रयत्न करतात. यात एकमेकांची स्पेस, किंवा समोरच्यासोबतच आपलं नातं किती आणि कसं आहे? याकडे दुर्लक्ष होत किंबहुना केलं जातं. जे असेल तर क्लिअर बोलत नाहीत. या आणि अश्या अनेक प्रसंगांना मुलींना सामोरे जावे लागते.
त्यामुळे मला अस प्रामाणिकपणे वाटतं, की आपल्याला ज्या व्यक्तीसोबत किंवा अनोळखी व्यक्तीसोबत बोलायचं आहे, त्या व्यक्तीला आपण त्यासोबत बोललेलं आवडणार आहे का? किंवा काही काम असेल तर थेट बोलून मोकळं व्हावं. आणि काही भावनाही असू शकतात एखाद्या बद्दल त्या नाकारू शकत नाही, पण त्याही व्यक्त करताना समोरच्याला काय वाटेल याचा विचार करायला हवा. आपल्या वागण्या बोलण्यातून आपला हेतू स्पष्ट होत असतो. त्यामुळे मैत्री नक्की करा, पण ती करताना एकमेकांची स्पेस जपा. आणि एखाद्या व्यक्तीकडून काही टक्के जरी नकार दिसला तरी समजून घ्या. आणि वेळ द्या. चांगली मैत्री झाली की मग बिनधास्त बोला. पण ओळख नसताना उगाच कुणाल आपल्या वागण्याचा किंवा बोलण्याचा त्रास होईल असं वागू नका...
© स्वप्निल मानव, संगमनेर
(८४८३८३४९९०)
Comments
Post a Comment