आत्महत्या (Suicide)...

आत्महत्या असो की इतर कुठली घटना, लगेचच उलटसुलट चर्चा सुरू होते. प्रतिक्रिया नोंदवल्या जातात. मला वाटतं, प्रतिक्रिया नोंदवण्यापेक्षा आपल्याला प्रश्न पडायला हवे. मुळात अशी घटना का, कुठे, कशामुळे, घडली? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत प्रतिक्रिया टाळायला हवी. आपल्यापर्यंत जी माहिती पोचली ती खरी आहे का? त्या माहितीचा स्रोत काय? माहिती पोचवण्याऱ्या व्यक्तीने जबाबदारीने, संवेदनशीलतेने ती माहिती पोचवली आहे का? असे मूलभूत प्रश्न महत्वाचे आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटना आपण बघत आहोत, याआधीही बघितल्या आहेत.

आत्महत्या कुणाची का असेना, शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची, सासरच्या त्रासाने त्रस्त सुनेची, इत्यादी. कुठल्याही कारणासाठी का असेना, त्यात एक कॉमन गोष्ट असते. अतीव दुःख, निराशा, संपल्याची भावना, हताश, असहायता, काहीच मार्ग न दिसणं, आहे ही परिस्थिती कधीच बदलणार नाही असा ठाम विश्वास, त्रागा, क्रोध, राग, अस्वस्थता, कुचकामीपणा इत्यादी आणि हे सगळं तीव्र स्वरूपाचं..... खूप त्रास व यातना असतात...

आत्महत्या suicide अचानक एका दिवसात instantly घडत नाही दीर्घकालीन त्रास संघर्ष चालू असतो. Its very painful. आत्महत्या suicide करण्याआधी कित्येकदा मरण आलेलं असतं. परंतु हार मानायची नाही, संघर्ष आयुष्याचा भाग, आज ना उद्या परिस्थिती चांगली होईल या आशेवर आजचं मरण उद्या वर ढकललं जातं इतकंच. पण एक दिवस तोही दिवस येतो जेव्हा सर्व शक्ती, प्रेरणा, आशा, स्वप्न संपतात..... ती वेळ सर्वात घातक असते ...….असं स्वप्न, आशा संपणं म्हणजे आयुष्य, जीवन संपणं. त्या वेळेत कोणाशी संपर्क आला किंवा वेगळी काही घटना घडली तर त्या क्षणी ती व्यक्ती आत्महत्या करण्यापासून दूर जाते..... तो क्षण मोलाचा असतो. असण्या- नसण्यात तो क्षण टळला तरी तात्पुरता टळलेला असतो. कारण आत्महत्या दीर्घकालीन त्रास, संघर्ष... कित्येकदा आत्महत्या कशी करायची याची मनोमन तयारी चालू असते. आपल्याच आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्ती थेट स्पष्ट शब्दातही सांगतात की, आपण आता जगणार नाही किंवा बऱ्याचदा सुचक बोलत असतात अशावेळी आपण सजग असू तर वाचवू शकू, योग्य ती मदत पोहोचवू शकू, योग्य उपचारापर्यंत नेऊ शकू. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचे त्रास, संघर्ष आपल्याला कदाचित माहीत असतात, पण अशावेळी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, आपण कशाला त्यांच्यात लुडबुड करायची असे विचार म्हणजे आत्महत्या होईपर्यंत वाट बघत बसणं. मग असं काही घडलं की रडणं...... रडणं सोप्पं आहे. मदत करणं, पाठीशी उभं राहणं, प्रसंगी योग्य भूमिका आपणच घेणं, अत्यावश्यक आहे आणि अवघडही  आहे. आत्महत्या सूचक आहे. आपल्याला सुचित केल्याशिवाय तरी घडत नाही. फार क्वचित अचानक घडत असेल, अपवाद असूच शकतो. आपल्याला सूचना मिळूनही आपण त्यावर काय करतो हेही महत्त्वाचं आहे.
अलीकडच्या आत्महत्येच्या बातम्या बघून मलाही चार व्यक्तींचे फोन आले, ते म्हणाले की, मॅडम, तुमच्याशी योग्य वेळी बोलू शकलो म्हणून मी आज आहे, धन्यवाद!
कित्येकांना असे अनुभव आले आहेत, हे काय दर्शवतं? 

तर गरज आहे आधाराची, प्रेमाने फुंकर घालण्याची, योग्य भूमिका घेण्याची, योग्यती मदत व उपचारापर्यंत नेण्याची, हे होऊ शकतं. आपली थोडी सजगता आवश्यक आहे. आत्महत्या हा  दीर्घकालीन त्रास, वेदना, संघर्ष,  to be or not to be  अशी स्थिती आहे. तरी आजुबाजुच्या व्यक्तींच्या सजगतेमुळे ते टळू शकतं. जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यात कधी तरी आत्महत्येचे विचार डोकावून जातात कारण Human suffering मानवी आयुष्यातील दुःख, व्यथा, त्रास, संघर्ष लढता-लढता इतकं थकायला होतं की सगळं अवसान गळून पडतं. पण तो शेवट नाही, थकल्यामुळे, दमल्यामुळे, अतिश्रम झाल्यामुळे विश्रांतीची गरज आहे असा तो निरोप असतो. परंतु तोच शेवट मानून सगळं संपतं.... कायमचं. कदाचित आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीलाही 'तो क्षण' सोडला तर सगळं संपवायचं नसेल....... 'तो क्षण', अवघड क्षण पार करता आला तर चित्र वेगळं असेल...

अॅड. छाया गोलटगावकर
chhaya.golatgaonkar@gmail.com

Comments

Popular posts from this blog

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...