प्रवास खाजगी कंपनीतील कामाचा


              अनेक दिवसांपासून या विषयावर मत मांडायचे होते.मी आज व्यक्त होतोय. सध्या सरकारी नोकऱ्यांची उपलब्धता लक्षात घेता तुलनेत दरवर्षी पदवीधर होऊन पास होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करून त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि स्पर्धेमुळे खूप तरुणांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्यांन पर्यंत उरतो किंबहुना ती खाजगी नोकरी करणं भाग पडतं. या परिस्थितीला मीही बळी ठरलो असं म्हणण्याला हरकत नाही. अगदी निवड प्रक्रियेपासून तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारची हैरारकी किंवा एक विशिष्ट गट आपले अस्तित्व घट्ट करण्याचा प्रयत्न करताना जाणवलं. सत्तेचं केंद्रीकरण आणि अधिकारांचा सोयीनुसार आणि मूडनुसार वापर होताना दिसला. खरंतर ज्या त्या विभागानुसार पदवीधर झालेला कोणताही विद्यार्थी प्रशिक्षण दिल्यानंतर प्रक्रिया समजून घेऊन काम करू शकतो फारसं अवघड काही नसतं. पण सुरुवातीला आपण नवीन असल्यामुळे वरिष्ठ स्तरावरून दडपण निर्माण करून ही प्रक्रिया कशी अवघड आहे असं भासवलं जात. तसेच प्रशिक्षण देताना संबंधित कामाच्या प्रक्रियेतील ढोबळ मार्ग सांगितला जातो. त्यातील बारकावे किंवा येणाऱ्या सर्व अडचणी किंवा शक्यता सांगितल्या जात नाही. कुठेतरी आपण अडकून वरिष्ठांना विचारण्यासाठी जायला हवं अशी पद्धतशीर व्यवस्था प्रशिक्षण देताना केली जाते. हळूहळू आपल्या या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहे असं त्यांच्या लक्षात आलं की मग हडतुड केलं जातं. छोट्या-छोट्या गोष्टींवरून मग सुनावलं जातं. प्रशिक्षणातील प्राथमिक किंवा बेसिक गोष्टी लवकर सांगितल्या जात नाही. मी अशा अनेक प्रकारच्या हैरारकीचा अनुभव घेतला आहे घेतो आहे. याउलट दुसरी एक बाजूही मला सांगाविशी वाटते, मला एका बाजूला वर सांगितलं तसा अनुभव आला तसाच काही खूप चांगले प्रशिक्षक ही भेटले, ते चांगले मित्र ही झाले. आत्तापर्यंत जे जे प्रशिक्षक मला लाभले त्यातील एक नाव नक्की इथे नमूद करावंस वाटत ते म्हणजे श्रीनिवास कंदूर.  मला श्रीनिवास कडून ज्या ऍक्टिव्हिटी शिकायला भेटल्या किंवा तो शिकवत असताना छान अनुभव आला. नवीन एम्प्लॉयीला प्रशिक्षण कसं द्यावं हे श्रीनिवास कडून खरचं शिकण्यासारखं आहे. श्रीनिवास सारखे असे चांगले लोकही  खाजगी कंपनी मध्ये भेटतात पण अशा माणसांची संख्या फार कमी आहे.

             बऱ्याच वेळा खाजगी कंपनी प्रशिक्षणाबाबत अनेक गोष्टी गृहीत धरल्या जातात. प्रशिक्षणाचा पाठपुरावा किंवा प्रक्रिया व्यवस्थित पुढे जात आहे किंवा नाही किंवा प्रशिक्षण प्रक्रिया पार पडत असतात त्यात काही अडथळे येत आहेत का? याकडे फारस लक्ष दिलं जात नाही. इथे फक्त एकाच बाजूने पाहिलं जातं ते म्हणजे प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीसोबतच वरिष्ठ बोलतात, त्यालाच विचारपूस करतात काही अडचड आहे का? वगैरेवगैरे. इथे प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला विचारलंच जातं नाही की, तुला प्रशिक्षण घेताना काही समस्या आहे का? कुठल्या प्रकारचे अडथळे येत आहेत का??  हे घडत नाही असा माझा अनुभव आहे. प्रशिक्षण घेताना खरं तर दोन्ही बाजू तितक्याच महत्वाच्या असतात त्यामुळे एका व्यक्तीकडून पाठपुरावा करणे म्हणजे सरळ-सरळ दुसऱ्या व्यक्तीला गृहीत धारण्यासारखचं आहे.
प्रशिक्षण प्रक्रिया जर दोन्ही बाजूंचा पाठपुरावा करत झाले तर ते प्रशिक्षण प्रभावी आणि कमी वेळेत होते, हे लवकर या व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींच्या लक्षात येवो.

(टीप:- हा माझा अनुभव आहे, त्यानुसार परिस्थितीच विश्लेषण केल आहे. अशी ही एक बाजू आहे हे लक्षात येण्यासाठी)

---©स्वप्निल मानव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कात्रज बोगदा ते सिंहगड ट्रेक: एक आठवणींनी भरलेला अनुभव

बाल संरक्षण मोठ्यांची सामूहिक जबाबदारी- राजूर ५५ मुली गर्भवती

सरकारी शाळा सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेताना...